मुंबई, दि. 6 फेब्रुवारी, 2022 : ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आज दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत ‘प्रभूकुंज’ या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी लतादीदींचं पार्थिव ठेवलं जाणार असून सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान शिवाजीपार्क इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दांत व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर, 1929 रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव ‘हेमा’ होतं. मात्र, वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी ‘लतिका’ नावाचं पात्र साकारलं, तेव्हापासून सगळेच त्यांना ‘लता’ म्हणू लागले आणि अशाप्रकारे ‘हेमा’ च्या त्या ‘लता’ झाल्या. लता ही कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही तिची भावंडं आहेत; सर्व निपुण गायक आणि संगीतकार आहेत.

लतादीदींना छायाचित्रे काढायला खूप आवडते, तसेच क्रिकेटची मॅच बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे. लतादीदींना असंख्य पुरस्कार मिळाले. त्यापैकी 1969 साली ‘पद्मभूषण’ आणि 1999 साली ‘पद्मविभूषण’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. दरम्यान चित्रपटसृष्टीतील भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च सन्मान 1989 साली त्यांना प्रदान करण्यात आला. एवढेच नव्हे, तर भारतातील सर्वोच्च समजला जाणारा ‘भारतरत्न’ हा किताब त्यांना 2001 साली प्रदान करण्यात आला.
लतादीदींनी 980 पेक्षाही अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. याशिवाय इतर वीस प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली. संगीतकार सलील चौधरी यांनी ‘मधुमती’ या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या ‘आजा रे परदेसी’ या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला.
१९६२ साली चीनने भारतावर अनपेक्षितपणे आक्रमण केले. त्या युद्धात भारताचे शेकडो जवान धारातीर्थी पडले. या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २७ जून १९६३ साली दिल्लीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक खास गीत ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे कवी प्रदीप यांनी लिहिले आणि त्या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. ते गीत लता दीदी यांनी गायले आणि ते अमाप लोकप्रिय झालेले गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मराठीतही दीदींनी असंख्य गाणी गायली आहेत. चित्रपट गीतांबरोबरच मराठीतील भावगीते त्यांनी गायली. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले.
लतादीदींचे खूप गाजलेले पहिले गाणे म्हणजे 1949 सालच्या ‘महल’ या चित्रपटातले खेमचंद प्रकाश या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले ‘आयेगा आयेगा आनेवाला’ हे गीत. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. या गीतानंतर दीदींनी मागे वळून पाहिले नाही. मात्र, लतादीदी आज आपल्याला सोडून गेल्या असल्या तरी त्यांचा सुमधुर व स्वर्गीय सूर कायम त्यांची आठवण देत राहील.
Add Comment