‘कलाकार व लेखक यांचे नवसृजन समाजाला समृद्ध करते’- राज्यपाल
मुंबई, दि. 3 नोव्हेंबर : मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम कृती असून मनुष्यमात्रांमध्ये देखील कलाकार व लेखक नवसृजनाचे दैवी कार्य करीत असतात. हे नवसृजन समाजाला समृद्ध करीत असते. साहित्य, संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशूतुल्यच म्हणावी लागेल, असा संदर्भ देताना साहित्य, संगीत व कलेचा उपयोग उन्नत समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आयोजित पहिल्या एक आठवड्याच्या कलाकार व लेखकांच्या निवासी शिबिराची शनिवारी सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते.

शिबिराची संकल्पना व नियोजन इतिहासकार व लेखक विक्रम संपत यांनी केले होते.
शिबिर समारोप कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, शिबिरात सहभागी झालेले डॉ विक्रम संपत, रहस्यकथा लेखिका मंजिरी प्रभू, बंगलोर येथील नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज व दिल्ली येथील सृजनात्मक लेखक व संपादकीय चित्रण कलाकार रणक सिंह मान प्रामुख्याने उपस्थित होते.

राजभवन येथे कलाकार व लेखकांची कार्यशाळा आयोजित करून आपण त्यांना उपकृत केले नाही तर त्यांनी आपल्या राजभवनातील वास्तव्याने आपणांस गौरवान्वित केले, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. संगीत व साहित्य यांना भौगोलिक सीमांचे बंधन नसून ते मनुष्याला दुःख विसरायला लावते, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

मुंबई विद्यापीठात ‘नृत्य विभाग सुरु करणार : डॉ पेडणेकर
मुंबई विद्यापीठात ललित कला, लोककला व संगीत विभाग आहे; मात्र नृत्य विभाग नाही, याबाबत नृत्य दिग्दर्शिका मधू नटराज यांनी केलेल्या निरीक्षणाची दखल घेऊन लवकरच विद्यापीठात नृत्य विभाग सुरु करण्याबद्दल आपण पावले उचलणार असल्याचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी यावेळी आश्वस्त केले.
Add Comment