
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021 : “एक्स शक्ती 2021” या भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव्याच्या सहाव्या पर्वाची फ्रान्समध्ये मिलिटरी स्कूल ऑफ द्रागिनन येथे सुरुवात झाली असून 15 नोव्हेंबर 2021 रोजी या सरावाचे उद्घाटन झाले. भारतीय लष्कराच्या पथकामध्ये तीन ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आणि गोरखा रायफल्स बटालियनच्या 37 सैनिकांचा समावेश आहे.
लष्करी मोहिमेचे संयुक्त नियोजन, कारवाई हाती घेताना परस्पर समन्वय आणि दहशतवाद प्रतिबंधक परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांच्या धोरणानुसार संयुक्त कारवाई करताना आवश्यक असलेल्या समन्वयकारक पैलूंचे आकलन यावर या प्रशिक्षणात भर देण्यात आला आहे. यामध्ये सहभागी असलेली पथके युद्धजन्य परिस्थितीमधील सज्जता आणि डावपेचांचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यामध्ये फायरिंग ड्रिल आणि युद्धाच्या वेळी अतिशय खडतर कामगिरी करण्याचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे. या सरावाचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात आले आहे तब्बल 36 तासांच्या सरावानंतर त्याचा समारोप होणार आहे आणि या दोन टप्प्यांमध्ये निर्धारिक मानकांची साध्यता तपासून पाहिली जाणार आहे.
या संयुक्त सरावाव्यतिरिक्त मार्सेलिस येथील माझारगेस या युद्ध स्मारकाला भेटीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या महायुद्धात हौतात्म्य पत्करलेल्या 1002 भारतीय सैनिकांच्या पार्थिवावर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. भारतीय आणि फ्रेंच पथकांनी या ठिकाणी एकत्रित मानवंदना दिली आणि या सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी त्यांना अभिवादन केले.
Add Comment