नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेच्या दोन अभिनव ग्राहक केंद्रीत उपक्रमांचा प्रारंभ केला. यामध्ये किरकोळ थेट गुंतवणूक योजना आणि रिझर्व्ह बँक- एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेसारख्या महत्वाच्या वित्तीय संस्थांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘ आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात 21व्या शतकातल्या सध्याच्या दशकाचा काळ हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. अशावेळी रिझर्व्ह बँकेची अतिशय महत्वाची भूमिका असणार आहे. रिझर्व्ह बँकेची संपूर्ण टीम देशाच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे.’’
आज प्रारंभ करण्यात आलेल्या दोन्ही योजनांचा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, या योजनांमुळे देशामध्ये गुंतवणुकीची व्याप्ती अधिक वाढणार आहे आणि छोट्या गुंतवणूदारांना भांडवली बाजारामध्ये प्रवेश मिळणे अधिक सुलभ होईल. त्यांना गुंतवणुकीसाठी अधिक सुरक्षित वाटेल. किरकोळ थेट गुंतवणूक योजनेमुळे देशातल्या लहान-लहान गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे आता सहज शक्य होईल आणि त्यांच्यासाठी हे सुरक्षित माध्यम असणार आहे. त्याचबरोबर एकात्मिक लोकपाल योजनेमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये ‘‘एक राष्ट्र- एक लोकपाल’’ ही कार्यप्रणाली आकार घेऊ शकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, गेल्या काही वर्षात देशातल्या बँकिंग क्षेत्रामध्ये आर्थिक समावेशनापासून ते तंत्रज्ञानाच्या एकात्मतेपर्यंत विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोविड महामारीच्या अत्यंत कठीण काळामध्ये या क्षेत्रात केलेल्या सुधारणांची ताकद आपण अनुभवली आहे. अलिकडच्या काळात सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयांचा प्रभाव वाढविण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांमुळे मदत झाली आहे.’’
देशाच्या नागरिकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून आणि गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ करण्याची गरज आहे, असे स्पष्ट करून पंतप्रधान मोदी यांनी गंतवणूकदारस्नेही आणि त्यांच्याविषयी संवेदनशीलतेची भावना असलेला एक देश, अशी भारताची नवीन ओळख रिझर्व्ह बँक अधिक मजबूत करेल, असा मला विश्वास असल्याचे अखेरीस नमूद केले.
Add Comment