नवी दिल्ली, दि. 11 नोव्हेंबर : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त देश ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत आहे.याचे औचित्य साधून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांनी आज ई – जीसीए (eGCA), नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए ) मधील ई-प्रशासन व्यासपीठ राष्ट्राला समर्पित केले.

पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाचा अवलंब करून, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने ई – जीसीए हे त्यांचे ई-प्रशासन व्यासपीठ कार्यान्वित केले आहे.नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या प्रक्रिया आणि कार्यान्वयनाचे स्वयंचलन हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ,नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या अंमलबजावणी सुरु असलेल्या 70% कार्याचा समावेश असलेल्या 99 सेवा आणि इतर टप्प्यांमध्ये 198 सेवा या प्रकल्पात समाविष्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती सिंदिया यांनी यावेळी बोलताना दिली.
कार्यान्वयन अकार्यक्षमता दूर करणे, किमान वैयक्तिक संवाद, नियामक अहवालात सुधारणा, पारदर्शकता आणि उत्पादकता वाढवणे यांसारखे महत्वपूर्ण बदल, हे एक खिडकी व्यासपीठ घडवून आणेल असे सांगत, प्रतिबंधात्मक नियमन ते रचनात्मक सहकार्यापर्यंत हे अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणल्याबद्दल त्यांनी, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महामारीच्या काळातील संकटाचे संधीत रूपांतर करणारे आमचे उत्तरदायी सरकार आहे, असे सिंदिया म्हणाले.

हा प्रकल्प माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि सेवा वितरण आराखड्यासाठी बळकट पाया निर्माण करेल. हा प्रकल्प नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाद्वारे प्रदान केलेल्या विविध सेवांची कार्यक्षमता वाढवेल आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या सर्व कार्यांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करेल. हा प्रकल्प सेवा प्रदाता म्हणून टीसीएस आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून पीडब्ल्यूएस च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
वैमानिक, विमान देखभाल अभियंता, हवाई वाहतूक नियंत्रक, हवाई वाहतूक परिचालक, विमानतळ परिचालक, हवाई प्रशिक्षण संस्था, देखभाल आणि डिझाइन संस्था इत्यादी विविध नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या हितसंबंधितांना प्रदान केलेल्या सेवा आता ई जीसीए वर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
अर्जदार आता विविध सेवांसाठी अर्ज करू शकतील आणि त्यांची कागदपत्रे ऑनलाइन सादर करू शकतील. वैमानिक आणि विमान देखभाल अभियंत्यांना त्यांच्या कार्याची रूपरेषा पाहण्यासाठी आणि त्यांची माहिती सहजपणे अपडेट करण्यासाठी मोबाइल अॅप देखील सुरू करण्यात आले आहे.
Add Comment