कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून युवक-युवतींचे अभिनंदन.
मुंबई, दि. 1 नोव्हेंबर : केंद्र शासनामार्फत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवकांनी २२ सुवर्ण आणि २३ रजत पदके, अशा एकुण ४५ पदकांची कमाई करुन स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. या सर्व स्पर्धकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातून आता एकुण ६० पेक्षा अधिक स्पर्धक बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार असून तेथील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपमध्ये सहभागी होतील. गांधीनगर स्पर्धेत पश्चिम प्रादेशिक ५ राज्ये आणि ओडीशा राज्याचा सहभाग होता. एकुण ८२ पैकी ४५ पदके पटकावून ५५ टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने २२ सुवर्ण आणि २३ रजत (एकुण ४५), राजस्थानने ८ सुवर्ण आणि ८ रजत (एकुण १६), गुजरातने ८ सुवर्ण आणि ४ रजत (एकुण १२), मध्य प्रदेशने ३ सुवर्ण आणि १ रजत (एकुण ४) गोव्याने १ सुवर्ण आणि २ रजत (एकुण ३) तर ओडीशाने २ रजत पदकांची कमाई केली आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी तरुणांनी जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Add Comment