केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘दलित सेवा सघटने’च्या 23 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध क्षेत्रांतील प्रसिध्द व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले.
गोवा, 30 ऑक्टोबर 2021 : केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक आज ‘दलित सेवा संघटने’चा 23 व्या वर्धापन दिन सोहोळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त गोव्यात मडगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. युवा पिढीसाठी ‘मूल्याधारित शिक्षण’ उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज असून या शिक्षणामुळे त्यांना स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाचे महत्त्व समजून येईल असे मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील दरी मिटविण्याचा प्रयत्न केला. यांची ही विचारधारा पुढे नेण्यासाठी ‘दलित सेवा संघटना’ गेल्या 23 वर्षांपासून अथकपणे कार्य करीत आहे ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे. पुरस्कार हे आतापर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती देत असतात आणि भविष्यात अधिक उत्साहाने कार्य करण्यास प्रवृत्त करतात असे नाईक यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मूल्याधारित शिक्षण युवा पिढीला योग्य दिशा दाखविण्यासोबतच समाजातील दुष्ट प्रवृत्ती टाळण्याचा मार्ग देखील आहे.

या प्रसंगी गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल ‘दलित सेवा संघटना’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर किसन फडते यांना ‘दलित सखा पुरस्कार-2021’ ने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील अनेक प्रसिध्द व्यक्तींचा देखील सत्कार करण्यात आला. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या सहकार्याने या वेळी अनेक गरजू विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
Add Comment