मुंबई, 18 ऑक्टोबर 2021 : पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त राखणे तसेच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे याबाबत जनजागृती करण्यासाठी आज मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 50 हून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला. नेहरू युवा केंद्र संघटनेने आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेल्या एक महिना कालावधीच्या देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा भाग आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा यांनी कुलाबा येथे, गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आज झालेल्या या अभियानात सहभागी झालेल्या नेहरू युवा केंद्र संघटनेचे सदस्य तसेच स्थानिक युवक वर्ग अशा 50 हून अधिक स्वयंसेवकांना स्वच्छता शपथ दिली.
या उपक्रमाच्या महत्त्वाविषयी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना उषा शर्मा म्हणाल्या की, देशभरातील 744 जिल्ह्यांतील 6 लाख गावांमध्ये स्वच्छ भारत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. “या अभियानाद्वारे 75,000 किलो कचरा, विशेषतः प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे आणि ठरविलेल्या लक्ष्याहून कितीतरी अधिक प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात येणार आहे हे सांगताना मला आनंद होत आहे,” असे त्या म्हणाल्या.

उषा शर्मा यांनी अधिक स्पष्टीकरण देत सांगितले की जर एक युवक पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी, प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यासाठी काही लोकांना प्रेरित करू शकत असेल तर एकत्रितपणे आपण सर्वजण स्वच्छतेबाबत जनतेत जाणीव निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होऊ. आणि यातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजणे तसेच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम समजणे या गोष्टी खात्रीपूर्वक घडू शकतील. “आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणणे आवश्यक आहे,” असे उषा शर्मा यांनी पुढे सांगितले.

मुंबईतील आणखी एक लोकप्रिय पर्यटन केंद्र असलेल्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर उद्या सकाळी 9 वाजता नेहरू युवा केंद्र संघटना आणि युवा स्वयंसेवकांतर्फे अशीच आणखी एक स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
Add Comment