गरमा गरम… “तंदूरी चाय “.
पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. अशाच एका गरमा गरम पेय पदार्थाबद्दल आपण जाणून घेऊयात.
भारतीय संसदेत सर्वाधिक ८० खासदार धाडणारे राज्य हे ‘उत्तर प्रदेश’ आहे. या राज्याची राजधानी ‘लखनऊ’ असून हे शहर ‘छोटा इमामवाडा’ आणि ‘मोठा इमामवाडा’, ‘पिक्चर गैलरी’, ‘घंटाघर’, यांसारख्या पुरावास्तू व इतिहास प्रसिद्ध स्थळं तसेच ‘जिनेश्वर मिश्रा पार्क’, ‘डॉ. भीमराव आंबेडकर गोमती विहार’ यांसारख्या निसर्गरम्य व ऐतिहासिक आठवणी साठवलेली पार्क इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हे शहर लखनऊ ‘शाही पान’ पासून चिकन कपड्यांसाठी आणि चिकनचे खाद्यपदार्थांसाठी नावाजलेले आहे. त्यात अधिकची भर पडलेली आहे ती म्हणजे तेथील “तंदूरी चाय ” नावाच्या गरमागरम पेय पदार्थाची.
लखनऊ शहरातील मारिन ड्राईव्ह म्हणजेच डॉ. भीमराव आंबेडकर गोमती विहार येथील ‘चाटोरी गल्ली (खाऊ गल्ली)’ येथे एका “तंदूरी चाय ” नावाच्या चालत्या-फिरत्या स्टॉलवर हा “तंदूरी चाय ” विकला जातो. एका चायची किंमत २५ रुपये इतकी मोठी आहे.
“तंदूरी चाय ” बनविण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हा चाय बनविण्यासाठी अतिउष्ण भट्टीमध्ये मातीचा घडू तप्त केला जातो आणि तो तप्त घडू घेऊन त्यात चायचे मिश्रण ओतले जाते आणि तो चाय त्या घडूमध्ये घोळवून घोळवून तो चाय आपल्याला मातीच्या ग्लासमधून दिला जातो. चाय सोबत मस्का बनपाव हवा असल्यास त्याची किंमत मोजल्यावर तो ही आपल्याला मिळतो. तेथील गारेगार थंड वातावरणात हा “तंदूरी चाय ” पिताना एक वेगळाच आनंद मिळतो. कधी तिथे भेट दिलीत तर त्या चायचा स्वाद व आनंद आवर्जून घ्या.
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई -५१.
Add Comment