“चार्टर फ्लाईट्सच्या परदेशी पर्यटकांना नवीन पर्यटक व्हिसा मंजूर करणे सुरू, चार्टर फ्लाइट्स व्यतिरिक्त अन्य पर्यटकांना 15 नोव्हेंबर पासून नवीन पर्यटक व्हिसा मिळणार”
पणजी, 18 ऑक्टोबर 2021 : केंद्रीय बंदरे, जहाज, जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज भारतीय पर्यटन, गोवा कार्यालयाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या आठवडाभराच्या मोहिमेचे पणजी येथे उद्घाटन केले. भारतीय पर्यटनाचे प्रादेशिक संचालक व्यंकटेशन दत्तात्रयन आणि व्यवस्थापक जितेंद्र जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
“स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव हे पंतप्रधानांचे उद्दिष्ट्य म्हणजे, हा ऐतिहासिक, गौरवशाली आणि तितकाच उत्सव भव्यतेने आणि उत्साहाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा महोत्सव हा भारताच्या नागरिकांना अर्पण केलेला आहे”, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

पुढे बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले, कोविड – 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटन क्षेत्राला आधार देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकारने व्यवसायाच्या सातत्यासाठी आणि धोरणासाठी पर्यटन क्षेत्रासह उद्योगासाठी अनेक नियामक आणि आर्थिक मदत उपायांचा विस्तारही केला आहे.
भारतात येणाऱ्या चार्टर फ्लाइट्सच्या परदेशी पर्यटकांना सरकारने 15 ऑक्टोबर 2021 पासून नवीन व्हिसा देण्यास प्रारंभ केला आहे. चार्टर विमानाव्यतिरिक्त अन्य उड्डाणाद्वारे भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना 15 नोव्हेंबर 2021 पासून हे करता येईल. पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनेकविध योजना आखल्या आहेत. `स्वदेस` आणि `प्रसाद` ही योजना राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य पुरविते.
गोवा राज्यासाठी मंत्रालयाने `स्वदेस दर्शन योजने`अंतर्गत रुपये 197 कोटी मंजूर करण्यात आले होते आणि हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. कोस्टल सर्किट – 1 च्या विकासास 2017 -18 मध्ये रुपये 99.35 कोटी मंजूर करण्यात आले होते. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.
18 ते 24 ऑक्टोबर 2021 दरम्यान आझादी का अमृत महोत्सव या राष्ट्रीय उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाचे गोवा क्षेत्रीय कार्यालय यांनी मॉल ब्रँडिंग एक्टिव्हिटीद्वारे आठवडाभराची मोहीम सुरू केली आहे. भारतीय पर्यटन गोवा यांच्या वतीने देखील मॉलमध्ये भेट देणाऱ्यांसाठी स्पॉट ड्राइंग आणि पेंटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे.
Add Comment