दिल्ली, दि. १७ सप्टेंबर : रेल्वेने, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज प्रधान मंत्री कौशल विकास योजने अंतर्गत रेल कौशल विकास योजनेचा रेल भवन इथे प्रारंभ केला. रेल्वे प्रशिक्षण संस्थांद्वारे, उद्योगाशी निगडीत कौशल्याचे युवकांना प्रवेश स्तरीय प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी ही रेल कौशल विकास योजना हाती घेण्यात आली आहे.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
देशभरात आज विश्वकर्मा जयंती साजरी केली जात असून हा पवित्र दिवस असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. रेल कौशल विकास योजना, पंतप्रधानांना वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी समर्पित केली. कौशल्य विकासाचा दृष्टीकोन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगून रेल कौशल विकास योजने अंतर्गत 50 हजार युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षाच्या काळात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सुरवातीला 1000 उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर आणि यंत्र दुरुस्ती अशा चार विभागात प्रशिक्षण दिले जाणार असून प्रारंभीच्या 100 तासांच्या प्रशिक्षणाचा समावेश यात राहणार आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या अर्जांमधून दहावीच्या परीक्षेतल्या गुणांच्या आधारावर, पारदर्शी प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. 10 वी पास आणि 18-35 या वयोगटातले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील. मात्र प्रशिक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींचा, या प्रशिक्षणाच्या आधारावर, रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी कोणताही दावा राहणार नाही. या कार्यक्रमाबाबत माहिती पुरवण्यासाठी नोडल संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. अर्ज मागवण्याची सूचना, निवड झालेल्या व्यक्तींची सूची, अंतिम मूल्यांकन, अभ्यासासाठीचे साहित्य आणि इतर तपशील यावर उपलब्ध असेल.
देशभरातल्या 75 रेल्वे प्रशिक्षण संस्था, हे प्रशिक्षण देण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत.
Add Comment