‘पाल’ ही घरातील भिंतींवर व छतावर वावरणारी व सरपटणारा प्राणी आहे. पण सापालाही न घाबरणारी माणसं मात्र ‘पाली’ला घाबरतात. कारण काय तर पाल दिसायला खूपच विचित्र आणि किळसवाणी असते. असे म्हणतात की, पाल जर अंगावर पडली तर तो अपशकून झाला असं समजून लगेच अंघोळ करायला हवी. काहीजणांच्या मते ही अंधश्रद्धा आहे.
खरंतर माणसांसाठी पालीचा स्पर्शही वाईटच असतो. शरीराच्या ज्या भागाला पालीचा स्पर्श होईल तो भाग साबणाने स्वच्छ धुवून घ्यावा. यालाही शास्त्रीय कारण आहे. पाल ही ‘रज्जुमान संघ’ (Phylum chordate – फायलम कोरडाटा) या समूहात मोडते. रज्जुमान संघाचे विभाजन (१) पुच्छरज्जुमान, (२) शीर्षरज्जुमान व (३) पृष्ठवंशी अशा तीन उपसंघामध्ये केले जाते. पृष्ठवंशी प्राण्यांचे ‘जंभहीन’ आणि ‘जंभयुक्त’ असे दोन विभाग करण्यात आलेले आहेत; त्यापैकी ‘जंभयुक्त’ विभागाच्या सहा वर्गांपैकी एक असलेल्या ‘सरीसृप’ गटात पालीचा समावेश होतो. तिची ‘काळसर विष्ठा आणि मूत्र (युरिक आम्लाचे पांढरे स्फटिक)’ हे एकत्रित लगद्याच्या स्वरूपात विसर्जित केले जाते. त्यामुळे जेव्हा पाल आपल्या अंगावर पडते तेव्हा किंवा पडताना तीची ‘काळसर विष्ठा आणि मूत्र (युरिक आम्लाचे पांढरे स्फटिक)’ शरीरावर पडण्याची किंवा विसर्जित होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्वचारोग किंवा शारीरिक व्याधी होऊ नयेत म्हणून पाल अंगावर पडली तर लगेच अंघोळ करायला हवी, असे सांगितले जाते.
खरंतर, पाल ही बिनविषारी असते. मात्र, तिच्या शरीरात साल्मोनेल्ला, लिस्टेरिया, एश्चेरिकिया कोलाय यांसारखे जीवाणू असतात. शिजविलेल्या अन्नात पाल पडली की तिच्या शरीरातील जीवाणूंमुळे अन्न दूषित होते. असे दूषित अन्न खाल्ल्याने मनुष्याला विषबाधा होते.
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
Add Comment