मुंबई, दि. १५ सप्टेंबर : जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिन्यात विविध सण, महोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून पर्यटनाशी संबंधीत घटकांचे ९५ टक्के तर पर्यटन विभागातील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे, पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू आणि काश्मिर तसेच तेथील लोक उत्सूक आहेत, असे आवाहन काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू आणि जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ट्रॅव्हल एजन्ट्स असोसिएशन ऑफ काश्मिरचे अध्यक्ष फारुख कुथू, जम्मू आणि काश्मिरचे मुंबई येथील सहायक पर्यटन अधिकारी बशीर अहमद वानी यावेळी उपस्थित होते.
काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू म्हणाले की, जम्मू-काश्मिर आणि महाराष्ट्रामध्ये खूप जुने संबंध आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरला नेहमीच पसंतीचे स्थान दिले आहे. आता कोरोनापश्चात काळात येथील पर्यटनाला पुन्हा बहर येत असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. पर्यटकांनी लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी केली असल्यास उत्तमच होईल. पण हे केले नसले तरी पर्यटक तिथे येऊ शकतात. तिथे आल्यानंतर अँटीजेन चाचणी करुन पर्यटकांना पर्यटनासाठी संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय म्हणाले की, जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिने पर्यटनासाठी विविध उपक्रम, महोत्सव आदींचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या काळात नवरात्र, दसरा, लोहडी, दिवाळी, ख्रिसमस, नववर्ष, पुढील वर्षात येणारी होळी असे अनेक सण-उत्सव आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारी बर्फवृष्टी, टुलीप फुलांचा महोत्सव, केसर महोत्सव, शरद ऋतुतील विविध महोत्सव यासह या काळात अद्भूत असे निसर्ग सौंदर्य पाहण्याची पर्यटकांना संधी आहे. बर्फातील विविध खेळ, पक्षी निरीक्षण, ट्रेकींग, हेरीटेज टुरीजम यांनाही जम्मू आणि काश्मिरमध्ये आता बहर येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी जगातील सर्वात सुंदर स्थळ असलेल्या जम्मू आणि काश्मिरला येत्या काळात अवश्य भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सर्व जम्मू आणि काश्मिरवासीय पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सूक आहेत, असे त्यांनी सांगितले.
Add Comment