शासनाच्या सर्व व्यवहारात व शिक्षणाच्या सर्व स्तरांत शुद्ध लिहिण्याबाबत शासनाचे काही नियम आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेल्या साहित्य महामंडळाने शुद्धलेखनाचे चौदा नियम सांगितले आहेत. त्या नियमांना महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर १९६२ मध्ये प्रथम भान्यता दिली. १९७२ च्या मार्चमध्ये या नियमांमध्ये आणखीन चार नियमांची भर घालून मूळ नियमांमधील त्रुटी दूर करून सुधारित नियम स्पष्टीकरणासह प्रसिद्ध केले गेले, हे नियम आपण आता एकएक करुन पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत.
(२) ऱ्हस्व-दीर्घ नियम:-
नियम 5: मराठीतील तत्सम (ऱ्हस्व) इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द प्रथमेत दीर्घान्त लिहावे. उदाहरणार्थ, कवी, मती, गती, गुरू, इतर शब्दांच्या अंती येणारा इ-कार व उ-कार दीर्घ लिहाबा. उदाहरणार्थ, पाटी, जादू, पैलू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय). अपवाद : आणि, नि.
स्पष्टीकरण : परंतु, यथामति, तथापि, इत्यादी तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावी. तसेच सामासिक शब्दांतही तत्सम (ऱ्हस्व) इ-कारान्त व उ-कारान्त शब्द पूर्वपदी असताना ऱ्हस्वान्तच लिहावे. उदाहरणार्थ, बुद्धिवैभव, कविमन, गतिशील.
नियम 6: (दीर्घ) ई-कारान्त व ऊ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इ-कार व उ-कार ऱ्हस्व लिहावे. उदाहरणार्थ, गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू. अपवाद : नीती, भीती, रीती, कीर्ती, इत्यादी दीर्घान्त झालेले तत्समशब्द.
नियम 7: अ-कारन्त शब्दांचे उपान्त्य इ-कार व उ-कार दीर्घ लिहावेे. उदाहरणार्थ, गरीब, वकील, वीट, सून, वसूल. अपवाद : ऱ्हस्वोपान्त्य अ-कारान्त तत्सम शब्द; उदाहरणार्थ, गुण, विष, मधुर, प्रचुर.
नियम 8: उपान्त्य दीर्र्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार-ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ, गरिबास, वकिलांना, सुुनेला, वसुलाची, नागपुरास, जिवाला (प्राण, मन, या अर्थी). अपवाद : दीर्घोपान्त्य तत्सम शब्द; उदाहरणार्थ, शरीरास, गीतेत, सूत्रास, जीवास (प्राणी या अर्थी)… (क्रमश: पुढील भागात).
Add Comment