फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे प्रकरण-9 मधील कलम 125 च्या तरतुदीनुसार-(1) पुरेशी ऐपत व कुवत असतांना जर कोणत्याही व्यक्तीने-
(अ) स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या पत्नीचा, अथवा
(ब) स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या औरस किंवा अनौरस अज्ञान अपत्याचा मग ते विवाहित असो वा अविवाहित असो, अथवा
(क) त्याचे सज्ञान झालेले औरस किंवा अनौरस अपत्य(विवाहित मुलगी नव्हे) कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक अपसामान्यतेमुळे किंवा क्षतीमुळे स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ असेल तर, अशा अपत्याचा, अथवा
(ड) स्वत:चा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या बापाचा किंवा आईचा निर्वाह करण्याबाबत उपेक्षा केली किंवा तो करण्यास नकार दिला तर, अशी उपेक्षा किंवा नकार शाबीत झाल्यावर प्रथम वर्ग दंडाधिकारी अशा व्यक्तीला आपल्या पत्नीच्या अथवा अशा अपत्याच्या अथवा बापाच्या किंवा आईच्या निर्वाहाकरिता अशा दंडाधिका-याला योग्य वाटेल त्या, मासिक दराने मासिक भत्ता द्यावा आणि दंडाधिकारी वेळोवेळी निदेशित करील, त्याप्रमाणे त्याने तो प्रदान करावा असा त्याला आदेश देऊ शकेल;
परंतु, खंड(ब) मध्ये निर्दिष्ट केलेली अज्ञान मुलगी विवाहित असल्यास, तिच्या पतीकडे पुरेशी ऐपत नाही अशी जर दंडाधिका-याची खात्री झाली तर, अशी अज्ञान मुलगी सज्ञान होईपर्यंत तिच्या बापाने तिला असा भत्त द्यावा असा आदेश दंडाधिकारी देऊ शकेल.
परंतु, आणखी असे की, या पोटकलमाखालील निर्वाहासाठीच्या मासिक भत्याच्या संबंधातील कार्यवाही प्रलंबित असताना दंडाधिकारी, अशा व्यक्तीला तिच्या पत्नीच्या किंवा अशा अपत्याच्या किंवा बापाच्या किंवा आईच्या अंतरिम निर्वाहाकरिता मासिक भत्ता आणि दंडाधिका-याला वाजवी वाटेल असा कार्यवाहीचा खर्च द्यावा आणि दंडाधिकारी वेळोवेळी निर्देेशित करील त्याप्रमाणे त्याने तो प्रयत्न करावा असा आदेश देऊ शकेल;
परंतु, तसेच अंतरिम निर्वाहभत्ता आणि दुस-या परंतुकाखालील कार्यवाहीचा खर्च यासाठीचा अर्ज, शक्य असेल तितपत, अशा अर्जाची नोटीस अशा व्यक्तीवर बजावण्यात आल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत निकालात काढण्यात येईल.
Add Comment