मोटार वाहन कायदा, १९८८ मध्ये मोठा फेरबदल व सुधारणा करुन दिनांक ९ ऑगस्ट, २०१९ पासून ‘मोटर वाहने (सुधारणा) कायदा, २०१९’ हा नवा कायदा अंमलात आलेला आहे. या कायद्यानुसार मोटार वाहनांच्या वापरामुळे झालेल्या अपघातातील मयत आणि जबर जखमी पीडितांना निश्चित भरपाई आणि विम्याची रक्कम मिळविण्यासाठी दावा करता येतो. हा दावा कोठे करायचा? कोण करु शकेल? त्याची कार्यपद्धती काय असते?, हे आता आपण जाणून घेऊयात…
नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा आणि कोठे करावा?
निश्चित भरपाईसाठी किंवा अपघाती विम्याची रक्कम मिळविण्यासाठी कोर्ट फी रु.१०/- चे टिकीट लावलेला अर्ज मोटार वाहन कायद्याच्या कलम १६६ अंतर्गत ‘मोटार अपघात मागणीहक्क अधिकरण’ यांच्याकडे केला जातो. असा अर्ज करण्यासाठी एक निश्चित कालमर्यादा असते. असा अर्ज अपघाताच्या घटनेच्या सहा महिन्यांच्या आत करावा लागतो. त्यानंतर भरपाईसाठी कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अपील :-
‘मोटार अपघात मागणीहक्क अधिकरण’ यांनी दिलेल्या भरपाई रक्कम ठरविणा-या निवाड्याविरूद्ध अपील उच्च न्यायालयात करता येतो. असा अपील अर्ज ‘मोटार अपघात मागणीहक्क अधिकरण’ यांनी निवाडा दिल्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत दाखल केले जाऊ शकतो. जर अपिलामधील विवाद्य रक्कम १०,०००/- रुपयांपेक्षा कमी असेल तर मागणीहक्क अधिकारणाच्या कोणत्याही निवाड्याविरुद्ध अपील करता येणार नाही.परंतु, अपीलकर्ता अपील वेळीच करु शकला नाही याला पुरेसे कारण होते अशी जर न्यायालयाची खात्री झाली तर, उक्त नव्वद दिवसांचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही त्याला अपील स्वीकारता येईल.
भारपाईसाठी अर्ज कोण दाखल करु शकेल?
मोटार वाहनांच्या वापरामुळे उद्भवलेल्या व्यक्तींचा मृत्यू, किंवा शारीरिक इजा यांचा समावेश असलेल्या भरपाईसाठी किंवा अपघाती विम्याच्या रक्कमेसाठी खालील व्यक्तींना ‘मोटार अपघात मागणीहक्क अधिकरण’ यांच्याकडे अर्ज करता येतो–
१. ज्या व्यक्तीला इजा पोहचली आहे त्या व्यक्तीला; किंवा
२. मालमत्तेच्या मालकाला; किंवा
३. अपघातामुळे मृत्यू घडून आला असेल तर, मृताच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही वैध प्रतिनिधींना; किंवा
४. इजा पोहचलेल्या व्यक्तीने किंवा प्रकरणपरत्वे, मृत व्यक्तीच्या सर्व वैध प्रतिनिधींनी किंवा त्यापैकी कोणीही रीतसर प्राधिकृत केलेल्या अभिकर्त्याला.
(कायद्याविषयीचे सर्वसामान्य ज्ञान वाचकांस व्हावे या हेतुने प्रसिद्ध केले आहे. ह्यात अनवधनाने काही चूका किंवा त्रुटी झाल्या असल्याचे लक्षात आणून दिल्यास त्या सुधारल्या जातील, याची कृपया नोंद घ्यावी.)
Add Comment