पूर्वाधात निरस परंतु उत्तरार्धात नाट्यमय कलाटणी घेतलेल्या पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात पंजाबने दमदार पुनरागमन करत सामन्यावर कब्जा केला आहे. या हंगामात तब्बल तिन सुपर ओव्हर खेळणाऱ्या पंजाब संघावर खरेतर चोकर्सचा शिक्का जवळपास बसल्यात जमा होता. मात्र ख्रिस गेल चा चांगला पायगुण पंजाबला लागताच या संघाने काही खळबळजनक विजय साकारले आहेत. या विजयासह पंजाब संघ १० गुण अजुनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिला आहे.
वास्तविकत: कर्णधार केएल राहुल, ख्रिस गेल आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे धुरंधर फलंदाज पंजाबकडे असतानाही केवळ १२६ धावांत त्यांचा खुर्दा उडाला. राहुल (२७ धावा) आणि ख्रिस गेलने (२० धावा) हैद्राबाद गोलंदाजांचा थोडाफार प्रतिकार केला परंतू मॅक्सवेल सहीत इतर फलंदाज औटघटकेचे पाहुणे ठरले. संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि राशिद खानने प्रत्येकी दोन बळी घेत पंजाबच्या डावाला सुरूंग लावला. पंजाबला इतक्या कमी धावसंख्येवर रोखताच हा सामना हैद्राबादकडे झुकला होता.
हैद्राबाद संघाला १२० चेंडूत ही लढत जिंकणे अवघड नव्हते. शिवाय वॉर्नर, बेअरस्टो आणि मनिष पांडेची त्रिमुर्ती चांगल्या फॉर्मात असल्याने पंजाब संघालाही विजयाची फारशी आशा नव्हती. सोबतच वॉर्नर, बेअरस्टोच्या अर्धशतकी सलामीने हैदराबादच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र बिश्नोईच्या फिरकीपुढे वॉर्नर बाद होताच हैद्राबादचे काऊंटडाऊन सुरू झाले. वॉर्नर पाठोपाठ बेअरस्टोला माघारी धाडत पंजाबने हैद्राबाद भोवती पंजा आवळणे सुरू केले होते.
कर्णधार राहुलने पंजाबचा हुकमी एक्का मो.सामीला आक्रमणाला लावताच त्याने आक्रमक अब्दुल समदचे आव्हान संपुष्टात आणले. तरीपण खेळपट्टीवर अजुनही भरवश्याचा मनिष पांडे आणि अष्टपैलू विजय शंकर तंबू ठोकून उभे होते. या दोघांनी ३३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत हैद्राबादची पडझड थांबवली होती. अखेर ख्रिस जॉर्डन आणि अर्शदिपसिंगने हैद्राबादच्या खात्म्याचा विडा उचलला आणि हैद्राबाद संघाला शरण येण्यास भाग पाडले.
या दोघांनी भेदक मारा करत अवघ्या १४ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी तिन बळी घेत हैद्राबादचे कंबरडे मोडले. मनिष पांडे, विजय शंकर, जेसन होल्डर, राशिद खान आणि प्रियम गर्ग यांनी अवसानघातकी फलंदाजी करत आपल्या संघाचा पराभव ओढवून घेतला. हैद्राबाद गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करूनही फलंदाजांच्या कुचकामी प्रदर्शनाने हा सामना हैद्राबाद साठी गोलंदाजांनी हसवले, फलंदाजांनी रडवले अशा प्रकारचा ठरला.
Add Comment