लहान आणि मोठ्या निर्यातदारांना टपाल सेवेच्या माध्यमातून ‘निर्यात सुलभता’ प्रदान करणे कराराचे उद्दिष्ट
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : भारत सरकारची टपाल सेवा आणि अमेरिकेची टपाल सेवा (यूएसपीएस) यांच्यामध्ये पोस्टल शिपमेंट संबंधित कस्टम इलेक्ट्रॉनिक डेटाचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे. यासंबंधी आज उभय देशांमध्ये सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आंतरराष्ट्रीय टपाल प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि त्याची इलेक्ट्रॉनिक माहिती एकमेकांना देण्यात येणार आहे. यामुळे टपाल गंतव्य देशामध्ये येण्याआधीच त्यासंबंधित सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे. दुसऱ्या देशातून प्रत्यक्ष टपाल आल्यानंतर सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करण्याचा वेळ वाचणार आहे. विकसनशील देशांमध्ये जागतिक टपाल वितरण कार्यपद्धतीनुसार टपालाने येणा-या वस्तूंची आधी सूचना विशिष्ट नियमांच्या अधीन राहून दिली जाते. आता भारत आणि अमेरिका यांच्यामध्येही अशा माहितीचे आदान-प्रदान होवू शकणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमध्ये विश्वसनीयता, स्पष्टता आणि सुरक्षितता निर्माण होवून कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होवू शकणार आहे.
भारताच्या दृष्टीने अमेरिका हे निर्यातीसाठी सर्वात अव्वल स्थान आहे. टपाल सेवेच्या माध्यमातून भारतातून अमेरिकेला वस्तू पाठविण्याचे प्रमाण जास्त आहे. 2019 मध्ये जवळपास 30 टक्के पत्रे आणि वस्तूंची लहान पाकिटे अमेरिकेला पाठविण्यात आली होती. तसेच बाहेरच्या देशातून येणा-या पाकिटांपैकी एकट्या अमेरिकेतून जवळपास 60 टक्के पाकिटे भारतामध्ये आली होती. आता नवीन सहकार्य करारानुसार ईएडी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक अॅडव्हान्स डेटाचे आदान-प्रदान सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये टपालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निर्यात करणे सोईचे ठरणार आहे. यामध्ये भारतातून रत्ने आणि आभूषणे, औषधे आणि इतर स्थानिक उत्पादने अमेरिकेमध्ये पाठविणे सोईचे ठरणार आहे. यामुळे वस्तूंच्या निर्यातीच्या मागण्या तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच वस्तूंना सीमाशुल्क विभागातून लवकर मंजुरी मिळू शकणार आहे.
या करारामुळे लहान आणि मोठ्या निर्यातदारांना टपाल सेवेच्या माध्यमातून ‘निर्यात सुलभता’ प्रदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होवू शकणार आहे. त्याचबरोबर भारताला जगातले प्रमुख निर्यात केंद्र बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पावूल आहे.
आज झालेल्या या करारावर भारत सरकारच्या टपाल विभागाचे उप महा संचालक (आंतरराष्ट्रीय संपर्क आणि वैश्विक व्यवसाय) प्रणव शर्मा, आणि अमेरिकेच्या टपाल सेवेचे वैश्विक व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट एच. रेन्स ज्यु. यांनी स्वाक्षरी केल्या.
Add Comment