चेन्नई/मुंबई, २५ सप्टेंबर : भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एसपी बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. त्यांनी सलमान खानचे ‘मैने प्यार किया’, ‘पत्थर के फूल’, ‘हम आपके है कौन’, ‘रोजा’ आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी गायन केलं होतं. पण तत्पूर्वी ‘एक दुजे के लिये’ या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं होतं.
तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
Add Comment