कोरोनाविरूद्ध आक्रमकपणे लढणारी ही देशातली वैशिष्ट्यपूर्ण मोहीम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, १५ सप्टेंबर : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत त्यामुळे प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी व परिवारांना आरोग्यसंपन्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आज मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आयोजित एका ऑनलाईन मेळाव्यात राज्यातील सरपंचाना संबोधित केले व या मोहिमेचे उद्घाटनही केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,मुख्य सचिव संजय कुमार, ग्रामविकास अपर मुख्य सचिव अरविंद कुमार,सहभागी झाले होते. या वेब मेळाव्यास राज्यातील सुमारे २८ हजार सरपंचांची उपस्थिती होती.
या मोहिमेस ऐतिहासिक मोहीम असे संबोधून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. सरपंचानी आपापल्या गावातील लोक हे मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का,हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे व हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे. गावकरी हे सरपंचांचे ऐकतात, विशेषत: या कोरोना साथीमध्ये गावोगावी सरपंचांनी प्रयत्नपूर्वक कोरोनाला आपल्या गावात येऊ देण्यापासून रोखले आहे.
Add Comment