ग्रामीण डाक सेवक, टपाल सेवेच्या जनजागृती मोहिमेचे नेतृत्व करणार; महाराष्ट्रातील अनुभवाच्या धर्तीवर देशभर ही योजना राबवली जाणार – केंद्रीय मंत्री संजय धोत्रे
मुंबई, 10 सप्टेंबर : टपाल विभागाच्या योजना देशातील संपूर्ण ग्रामीण भागात पोहचाव्यात यासाठी टपाल विभागाच्या पंचतारांकित गावे योजनेचे उद्घाटन आज करण्यात आले. टपाल विभाग अनेक उत्पादने आणि सेवा पुरवते मात्र ते खेड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणूनच अशी सर्व उत्पादने आणि सेवा ग्रामीण स्तरावर उपलब्ध करुन देण्यासाठी पंचतारांकित गावे योजना सुरू करण्यात आली आहे. शाखा कार्यालये त्यांच्या टपालविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘वन स्टॉप शॉप’ म्हणून काम करतील.
खेड्यातील प्रत्येक घरात खाली नमूद केलेल्या टपाल योजनांची 100 टक्के व्याप्ती सुनिश्चित करणे हे पंचतारांकित गाव योजनेची संकल्पना आहे. कोणत्याही गावाने खालीलपैकी चार योजना पूर्ण केल्या तर त्या गावाला चार तारांकित दर्जा मिळतो, जर कोणत्याही खेड्यातून तीन योजना पूर्ण झाल्या तर त्या गावाला तीन तारांकित दर्जा मिळतो.
-बचत बँक खाते (एसबी / आरडी / टीडी / एमआयएस किंवा एनएससी / केव्हीपी प्रमाणपत्र )
-सुकन्या समृद्धि खाते / पीपीएफ खाते
-वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले आयपीपीबी खाते
-टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी
-पंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
सुरुवातीला महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येईल, त्यानंतर त्या अनुभवाच्या धर्तीवर संपूर्ण देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. पोस्टमन आणि टपाल विभाग हे सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण घटक आहेत. कोविड19 मुळे उद्भवलेल्या कठिण काळातही भारतीय टपाल विभागाने वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य करत सामान्यांना अतिशय चोख सेवा दिली असे धोत्रे यावेळी म्हणाले.
पंचतारांकित गावे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे एक आदर्श उदाहरण महाराष्ट्र देशासमोर निर्माण करेल असा विश्वास महाराष्ट्र सर्कल आणि गोवा राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश चंद्र अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याकडे व्यक्त केला. महासंचालक विनीत पांडे, मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Add Comment