मुंबई, ४ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उद्या काळ्या फिती लावून यंदाचा शिक्षक दिन साजरा करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी कळविले आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून वर्षानुवर्षे शिक्षकांना उपाशीपोटी अध्यापन कार्य करावे लागत आहे राज्य महासंघाशी दि २६ /०२/ २०१९ रोजी चर्चा करून शासनाने लिखित स्वरूपात शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, विधीमंडळात तसे जाहीर केले आहे. दि १८/०२/२०२० रोजी झालेल्या बैठकीत मान शिक्षण मंत्री महोदयांनी एक महिन्यात आदेश काढले जातील असे सांगितले होते, त्यानंतर वेळोवेळी मागणी करूनही अद्याप आदेश काढले नाहीत. मान उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नाम श्री अजितदादा पवार यांनी शिक्षकांसाठी निधीची तरतूद केली जाईल असे सांगितले आहे. तरीही शिक्षक समस्यांचे निराकरण होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने यंदाचा शिक्षकदिन हा काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचे पत्र मान शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांना दि २८/०८/२०२० रोजी ई-मेल ने दिलेले आहे. उद्या शिक्षकदिनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काळ्याफिती लावून काम करणार आहेत. आज राज्यात ठिकठिकाणी संघटनेने जिल्हा धिकारी , तहसीलदार कार्यालयासमोर यासाठी निदर्शने करून निवेदने सादर केली, काही ठिकाणी शिक्षकांच्या आंदोलनास परवानगी नाकारल्याने तेथे निदर्शने होऊ शकली नाहीत.
राज्य महासंघाच्या तातडीच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत–
१) मूल्यांकन पात्र घोषित, अघोषित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतन अनुदान देणे. केवळ घोषित यादीचा विचार न करता अघोषित यादीतील शिक्षकांना देखील हे वेतन अनुदान देण्यात यावे.
२) दशकाहून अधिक काळ २००२-२००३ पासून वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे.
३) आय टी विषय शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे. आय टी चे शिक्षक गेल्या १० वर्षांहून अधिक काळ विनावेतन/अत्यल्प वेतनावर कार्यरत आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आय टी शिक्षक संबधित शाळा महाविद्यालयात अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत. बोर्डांच्या परीक्षेत ऑनलाईनची सर्व कामे हे शिक्षकच करीत आहेत, त्यामुळे या विनावेतन/अत्यल्प वेतन असणाऱ्या शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतनअनुदान देणे गरजेचे आहे.
४) सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
५) शासकीय कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी.
मुंबई परिसरातील सुमारे १०००० शिक्षक उद्या काळ्या फिती लावून काम करतील असे मुंबई संघटनेचे अध्यक्ष प्रा अमर सिंह, सरचिटणीस प्रा मुकुंद आंधळकर,उपाध्यक्ष प्रा श्रीप्रकाश दीक्षित, प्रा राजेन्द्र शिंदे,प्रा डाॅ संजय आघाव व इतर पदाधिकारी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Add Comment